जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी जिल्ह्यातील सर्वांना सोबत घेणार: माजी आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 24/10/2026 : सोलापूर जिल्ह्यात कोणत्याही सहकारी संस्थेची निवडणूक ही पक्षीय पातळीवर लढवली जात नाही. हीच परंपरा पुढे चालू ठेवत जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी आपण सर्वांशी संपर्क साधून जिल्ह्याची घडी पूर्ववत करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे मत माजी आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील यांनी व्यक्त केले.
शिवरत्न बंगल्यावर सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विचारविनिमय बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार धैर्यशील मोहिते पाटील, आमदार अभिजीत पाटील, धनाजी साठे, ज्येष्ठ नेते लक्ष्मणराव ढोबळे, सविता राजे भोसले, देवानंद बागल, शिवानंद पाटील, अनिकेत देशमुख, प्रथमेश म्हेत्रे, शिवानंद पाटील यांच्यासह जिल्हाभरातील सर्व तालुक्यातील प्रमुख नेते मंडळी व कार्यकर्ते उपस्थित होते.
रणजीतसिंह मोहिते पाटील पुढे म्हणाले आपण अध्यक्षपदाच्या कार्यकाळात सर्व वडीलधाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली काम केले असून आपल्या कार्यकाळात १५०३ कोटीच्या ठेवी पाचच वर्षात दुप्पट म्हणजे २९६२ कोटी झाल्या. रिझर्व बँकेच्या नियमाने कराव्या लागणाऱ्या गुंतवणुकी ४५२ कोटीवरून १२८२ कोटीवर नेली. शेतकऱ्यांचे कर्ज नवं जुन न केल्यामुळे त्याकाळी झालेल्या कर्जमाफीत राज्यात सर्वात जास्त म्हणजे सुमारे ६०० कोटींची कर्जमाफीचा लाभ सव्वादोन लाख शेतकऱ्यांना झाला. बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी ट्रॅक्टर व गृह कर्ज उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली तर पंढरपूर येथे तीस एकर मैदानात केशर मातीचे प्रदर्शन भरवले त्यासाठी सव्वा ते दीड कोटी रुपये खर्च झाला असला तरी केवळ बारा ते तेरा लाख बँकेचे खर्च झाले असून बाकीचे सव्वा ते दीड कोटी रक्कम आपण इतर माध्यमातून उपलब्ध केल्याची त्यांनी सांगितले.
यावेळी जिल्हाभरातून आलेल्या विविध नेत्यांनी मनोगते व्यक्त केली यामध्ये बाळासाहेब पाटील यांनी आपले वडील भाई एस. एम. पाटील यांनी स्वतःसाठी अथवा संस्थेसाठी एकही रुपया घेतलेला नव्हता. त्यावेळी दिलेल्या कर्जाची वसुली चालू असतानाही संचालक म्हणून लांचनास्पद आरोप केले गेल्याचे सांगत मोहिते पाटील यांनी पॅनल उभा करावे आम्ही त्यांच्या पाठीशी असल्याचे सांगितले, यावेळी तेजस बोबडे, पंढरपूरचे तळेकर, सिद्धेश्वर सहकारीचे माजी संचालक भारत जाधव, मंगळवेढ्याचे भारत पाटील, करमाळ्याचे दशरथ कांबळे, ॲड दीपक पवार, शिवानंद पाटील, डॉक्टर अनिकेत देशमुख, बार्शीचे विश्वास बारबोले, जेष्ठ नेते लक्ष्मणराव ढोबळे, आदींनी मनोगते व्यक्त केली, माजी आमदार धनाजी साठे यांनी जिल्ह्याची घडी पूर्वत बसविण्यासाठी योग्य रीतीने प्रयत्न करून निवडणूक लढवावी असे मार्गदर्शन केले. तर आमदार अभिजीत पाटील यांनी जिल्हा बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अधिकाऱ्यांनी तफावत असणारे आकडे सादर केल्याचे सांगून जिल्हा बँक शेतकऱ्यांचीच राहावी असे वाटत असल्यास सर्वांनी पक्ष भेद विसरून एकत्र येणे गरजेचे असल्याचे सांगितले. यावेळी सर्वांनी मोहिते पाटील यांनी संपूर्ण पॅनेल उभा करून डीसीसीची निवडणूक लढवावी असे मत व्यक्त केले.