वास्तवाचे भान आणि झालेला बदल
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 18/06/2026 :
मी जितकी वर्षे जगलो आहे, त्यापेक्षा आता कमी वर्षे जगायची आहेत, हे समजल्यापासून माझ्यात झालेले बदल.
आता एखाद्या जवळच्या व्यक्तीच्या निधनाने मी फार रडत नाही, कारण आज नाही तर उद्या माझीही वेळ येणार आहे हे मला उमगले आहे.
त्याचप्रमाणे, माझे अचानक निधन झाले तर माझ्यानंतर काय होईल याचीही चिंता करणे सोडले आहे. कारण माझ्याविना कोणी उपाशी राहणार नाही आणि माझी संपत्तीही माझ्यासोबत जाणार नाही.
समोरच्या व्यक्तीचा पैसा, सत्ता किंवा पद पाहून आता मी घाबरत नाही.
स्वतःसाठी भरपूर वेळ काढू लागलो आहे. जग माझ्या खांद्यावर टिकून नाही आणि माझ्याविना काहीच थांबणार नाही, हे स्वीकारले आहे.
छोट्या विक्रेत्यांशी आणि फेरीवाल्यांशी घासाघीस करणे बंद केले आहे. कधी फसवणूक होत आहे हे माहीत असूनही हसत स्वीकारतो.
भंगार गोळा करणाऱ्यांना जुनी वर्तमानपत्रे, रिकामे डबे सहज देऊन टाकतो. त्यांना मिळणारा आनंद पाहून मलाही समाधान मिळते.
…रस्त्यावर बसून व्यापार करणाऱ्या एखाद्या गरजू व्यक्तीकडून कधी गरज नसलेली वस्तूही विकत घेतो.
…ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांचे तेच तेच बोलणे कितीही वेळा शांतपणे ऐकतो. “हे तुम्ही आधीही सांगितले आहे” असे म्हणणे सोडले आहे.
…चुकीच्या व्यक्तीशी वाद घालण्यापेक्षा मानसिक शांतता जपणे पसंत करतो.
…लोकांच्या चांगल्या कामांची आणि विचारांची मनापासून प्रशंसा करतो. त्यातून मिळणारा आनंदस्वतःच्या वाईट सवयी आणि हट्टी समजुती माझ्यावर लादण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांपासून अंतर ठेवतो. त्यांना बदलण्याचा प्रयत्नही आता करत नाही.
जीवनाच्या शर्यतीत मला मागे टाकण्यासाठी कोणी डावपेच खेळत असेल, तर मी शांतपणे त्याला पुढे जाऊ देतो. कारण मी कोणाशी स्पर्धा करत नाही आणि माझा कोणी प्रतिस्पर्धीही नाही.
…मला आनंद देणाऱ्या गोष्टी करतो. लोक काय म्हणतील याची चिंता त्यांच्यावरच सोपवली आहे. इतरांना खुश ठेवण्यासाठी स्वतःचे मन मारणे बंद केले आहे.
…पंचतारांकित हॉटेलांपेक्षा निसर्गाच्या सान्निध्यात राहणे आवडते. जंक फूडपेक्षा साध्या, पौष्टिक अन्नात समाधान मिळते.
…स्वतःवर हजारो रुपये खर्च करण्यापेक्षा एखाद्या गरजूच्या हातात मदतीची रक्कम ठेवण्याचा आनंद अधिक मोठा वाटतो. मदत करण्याची वृत्ती पूर्वीही होती आणि आजही आहे.
…चुकीच्या माणसासमोर स्वतःला बरोबर सिद्ध करण्यापेक्षा शांत राहणे पसंत करतो. जास्त बोलण्यापेक्षा मौनाची निवड करतो. स्वतःवर प्रेम करायला शिकलो आहे.
…मी या जगातला एक प्रवासी आहे. माझ्यासोबत फक्त केलेली सत्कर्मे, वाटलेले प्रेम, आदर आणि माणुसकीच जाणार आहे, हे स्वीकारले आहे.
…हा देह आई-वडिलांची देणगी आहे, आत्मा परमेश्वराची देणगी आहे, नावही इतरांनी दिलेले आहे. जेव्हा माझे स्वतःचे काहीच नाही, तेव्हा नफा-तोट्याची गणिते कशाला?
…माझ्या दुःख-तक्रारी लोकांना सांगणे बंद केले आहे. कारण जे समजून घेतात त्यांना सांगावे लागत नाही आणि ज्यांना सांगावे लागते ते समजून घेतच नाहीत.
…आता मी माझ्या आनंदात रमतो. माझ्या सुख-दुःखासाठी शेवटी मी स्वतःच जबाबदार आहे, हे समजले आहे.
…प्रत्येक क्षण जगायला शिकलो आहे. कारण जीवन अत्यंत मौल्यवान आहे. येथे काहीही कायमचे नाही आणि काहीही कधीही घडू शकते. हे दिवसही निघून जातील.
…अंतःकरणातील आनंदासाठी अध्यात्माचा मार्ग स्वीकारला आहे. मानवसेवा, जीवदया आणि निसर्गसेवेत स्वतःला झोकून दिले आहे. अनंताकडे जाणारा मार्ग याच्यातून जातो, हे मला समजले आहे. निसर्गाच्या कुशीत राहायला शिकलो आहे, कारण शेवटी त्याच कुशीत विलीन व्हायचे आहे.
उशिरा का होईना, पण समजले आहे…
कदाचित आता मला खऱ्या अर्थाने जगता यायला लागले आहे.
प्रविण सरवदे