जड देहाचा अभिमान नसे !
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 22/10/2026 : अभिमान माणसाला अधोगतीकडे नेतो आणि नम्रता उन्नतीकडे. अभिमान म्हणजे काय? मी मोठा, माझ्यामुळे झालं, माझ्याशिवाय काही होणार नाही ही भावना. अभिमानी माणसाला वाटतं मला सगळं येतं. तो कोणाचं ऐकत नाही. अभिमानी माणसाच्या जवळ कोणी जास्त वेळ थांबत नाही. मित्र, परिवार सगळे हळूहळू लांब जातात. शेवटी तो एकटा पडतो. संत म्हणतात, जिथे ‘मी’ पणा येतो, तिथे देव निघून जातो. उदा- रावणाकडे ज्ञान होतं, पैसा होता, सत्ता होती, पण “मीच देव” हा अभिमान आला आणि सोन्याची लंका जळून गेली. फळाने भरलेलं झाड नेहमी वाकतं आणि रिकामं झाड ताठ उभं राहतं. माणसाने फळांनी भरलेल्या झाडासारखं नम्र असावं.
येताना काही घेऊन आलास काय?
जाताना काही घेऊन जाणार काय?
नको अभिमान करू भल्या माणसा ||
जन्माला आलास तेव्हा मूठ बंद होती, पण हातात काहीच नव्हतं. जाताना मूठ उघडी असेल, तरी हातात काहीच नसेल. मग हा अभिमान कशाचा? माझं घर, माझी गाडी, माझी सत्ता, माझा पैसा. हे सगळं इथेच राहणार आहे. सोबत जाणार काय? तर फक्त तू केलेलं चांगलं कर्म, तू दिलेलं प्रेम, आणि तू जपलेली माणुसकी. “अभिमान गेला, तुका म्हणे देव झाला” जोपर्यंत माणसाच्या मनात ‘मी’ आहे, तोपर्यंत तो जीव आहे. ज्या क्षणी ‘मी’ पणा म्हणजे अभिमान गेला, त्याच क्षणी तुकाराम महाराज म्हणतात तो जीवच देव होऊन जातो. देव कुठे लांब नाही, आपल्या आतच आहे. पण अभिमानाचा पडदा असल्यामुळे दिसत नाही. जसा ढग गेला की सूर्य दिसतो, तसा अभिमान गेला की आतला देव दिसतो.
कुणी काही म्हणा,मज भान नसे |
जड देहाचा अभिमान नसे ! ॥धृ॥
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, कोणी काहीही बोलू दे, निंदा करू दे किंवा स्तुती करू दे. मला त्याचे काहीही भान नाही, मी त्याने विचलित होत नाही. या नाशवंत, जड शरीराचा मला आता अभिमान/अहंकार उरला नाही. उदा- एखाद्या लहान बाळाला कोणी काहीही म्हटलं, तर त्याला काहीच वाटत नाही. कारण त्याला देहाचा, इज्जतीचा अभिमान नसतो. संतांची अवस्था त्या बाळासारखी निरागस असते. जोपर्यंत “लोक काय म्हणतील” याचा विचार आहे, तोपर्यंत आपण दुःखी आहोत. ज्या दिवशी “कुणी काही म्हणा” म्हणायची ताकद येईल, त्या दिवशी आपण खरे मुक्त होऊ.
परि एकचि चिंतन ध्यानी-मनीं |
मनमोहन दर्शन हो नयनी ।
त्यासाठीच जिव वेडावत हा |
हे सकळ जगत् हीओस दिसे ||1||
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, माझ्या ध्यानात आणि मनात आता फक्त एकच विचार आहे. माझ्या डोळ्यांनी त्या मनाला मोहून टाकणाऱ्या पांडुरंगाचे दर्शन व्हावे. त्यासाठीच माझा जीव वेडापिसा झाला आहे आणि त्याच्यापुढे हे सगळं जग मला ओसाड, रिकामं वाटतंय. जसे एखाद्याला भूक लागली की त्याला फक्त अन्नच दिसतं, तसा माझा जीव विठ्ठलासाठी वेडावला आहे आणि एकदा देवाची ओढ लागली की, हे सगळं सोनं-नाणं, मान-अपमान असलेलं जग ओसाड वाटू लागतं. गावात सगळं असूनही घरात आपलं माणूस नसेल तर घर ओस वाटतं, तसंच विठ्ठलाशिवाय हे जग ओस वाटतंय. उदा- कस्तुरीमृगाच्या बेंबीतच कस्तुरी असते, पण त्याला वाटतं सुगंध बाहेरून येतोय, म्हणून तो वेड्यासारखा जंगलभर फिरतो. तसे महाराज देवासाठी वेडे झाले आहेत. जेव्हा आपण एखाद्या गोष्टीवर खरं प्रेम करतो, तेव्हा बाकी सगळं जग फिकं वाटू लागतं. इथे महाराजांचं प्रेम देहावर, मनावर नाही, तर त्या मनमोहन विठ्ठलावर आहे. हाच तर खरा अभिमान नष्ट झाल्याचा पुरावा आहे.
पशु-पक्षी जरी दिसताती वनी |
त्यासीच पुसे मन धावुनिया |
सांगाल कुणी मनमोहन तो |
त्या भेटिविणा जिव शांत नसे ||2||
महाराज म्हणतात, जंगलात जरी पशु-पक्षी दिसले तरी माझं मन धावत जाऊन त्यांनाच विचारतं. अरे, तुम्ही त्या मनमोहन विठ्ठलाला कुठे पाहिलं आहे का? त्याच्या भेटीशिवाय माझ्या जीवाला शांतता नाही. महाराजांची अवस्था एखाद्या विरहिणीसारखी झाली आहे. ज्याचा आपल्यावर जीव आहे, तो हरवला की माणूस वेड्यासारखा सगळ्यांना विचारतो, तसे महाराज झाले आहेत. हीच खरी भक्तीची सर्वोच्च अवस्था आहे. जिथे भक्ताला दगडात, झाडात, पशुत सगळीकडे फक्त देवच दिसतो. उदा- एखादं लहान मूल गर्दीत हरवलं की आई वाटेत भेटेल त्या प्रत्येकाला विचारते – “माझं बाळ पाहिलं का?” तिला लाज, अभिमान काहीच आठवत नाही. तिच्या डोळ्यात फक्त आपल्या बाळाची प्रतिमा असते. महाराजांना लोक काय म्हणतील याचं भान नाही, कारण ते विठ्ठलाच्या विरहात वेडे झाले आहेत.
अविकार प्रभुचे रुप सदा |
मन निर्मल ठेविल सत्वगुणी |
तुकड्या म्हणे जीवन-मानस हे |
प्रभुच्या स्वरुपाविण व्यर्थ दिसे ||3||
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, त्या प्रभूचे रूप कधीही न बदलणारे, अविनाशी आहे. मी माझं मन सत्वगुणात ठेवून निर्मळ केलं आहे. महाराज म्हणतात, हे माझं जगणं आणि हे मन त्या प्रभूच्या रूपाशिवाय मला सगळं व्यर्थ वाटतं. महाराज सांगतात या जगात सगळं बदलतं. पैसा बदलतो, माणसं बदलतात, शरीर बदलतं, विचार बदलतात. याला ‘विकार’ म्हणतात. पण फक्त एकच गोष्ट कधीच बदलत नाही, ती म्हणजे प्रभूचं रूप ते अविकार आहे. ते अविकार रूप दिसण्यासाठी आपलं मनही निर्मळ लागते. चिखल असलेल्या पाण्यात सूर्य दिसत नाही, पाणी स्वच्छ झालं की दिसतो. तसं रजोगुण आणि तमोगुणाने भरलेलं मन चिखलासारखं असतं. मी माझं मन सत्वगुणी म्हणजे शांत, पवित्र, निर्मळ ठेवलं आहे आणि शेवटी महाराज आपला सगळा अनुभव सांगतात, प्रभू दिसल्याशिवाय हे जीवनच व्यर्थ आहे. नोकरी, घर, मान, सन्मान सगळं मिळालं, पण जर त्या अविकार प्रभूला भेटलोच नाही, तर हे सगळं जीवन वाया गेलं.
उदा- सोन्याला कितीही आकार द्या, अंगठी करा, हार करा, त्याचा आकार (विकार) बदलतो. पण आतलं सोनं (तत्व) तेच राहतं. तसं जगाचे आकार बदलतात, पण प्रभूचा आत्मा तोच अविकार. आरशावर धूळ असेल तर चेहरा दिसत नाही. आरसा पुसला की चेहरा स्वच्छ दिसतो. आपलं मन हाच आरसा आहे. राग, लोभ, अभिमान ही धूळ आहे. सत्वगुण म्हणजे तो आरसा पुसणे. मन निर्मळ झालं की अविकार प्रभू आपोआप दिसतो. जेव्हा अभिमान गेला, तेव्हा मन निर्मळ झालं. मन निर्मळ झालं तेव्हा जग ओस दिसू लागलं आणि फक्त त्या अविकार प्रभूचाच ध्यास लागला. आता कोणी काहीही म्हणो, काहीच फरक पडत नाही.

पुरुषोत्तम बैसकार, मोझरकर
व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार प्राप्त
श्री गुरुदेव प्रचारक यवतमाळ
फोन 9921791677