आळशी लोकांचा मला न लागो वारा !
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 2/8/2026 :
आळस माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे. आळशी माणूस फक्त विचार करतो पण कृती करत नाही. आळशीपणामुळे चांगली संधी चालून येत असताना तो टाळतो. आळसामुळे गरीबी आणि दुःख ओढवते. हाताला काम नसल्याने तो माणूस वाईट संगतीकडे वळतो. “माझ्याने होणार नाही” हा विचार आळसामुळे येतो. कर्म ही पूजा आहे. मग उठा, काम करा, सेवेत लागा, हातपाय हलवा, आळस झटकून टाका. यशस्वी आणि आळशी माणूस कधीच एकत्र येत नाही. एकतर आळसाला मारा, नाहीतर आळस तुम्हाला मारेल. “कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन” श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतो, अरे अर्जुना तुझ काम फक्त प्रामाणिकपणे कर्म करणे आहे. त्याच फळ काय मिळेल याचा विचार करु नकोस. फळ मिळेल म्हणून कर्म करीन आणि नाही मिळाले तर कर्मच करणार नाही असेही करु नकोस.
आड नका येऊ, चला फिरा माघारा |
आळशी लोकांचा मला न लागो वारा ||
नको तुमची पूजा, भक्तीचाही पसारा |
काय होते करुनिया, ढोंग धतुरा ||धृ||
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी कर्मयोग, स्वावलंबन आणि आळशीपणाचा त्याग करण्याचा अत्यंत प्रभावी संदेश या भजनात दिला आहे. माझ्या सत्कार्यात अडथळा आणू नका. उलट फिरुन मागे जा. जे लोक प्रगती, स्वच्छता, एकता यांच्या कामात अडचणी निर्माण करतात. त्यांनी माझ्या जवळ येऊच नये. आळशी, निष्क्रिय आणि कामचुकार लोकांची संगत मला नको. अशा लोकांच्या प्रभावापासून दूर राहावे. केवळ पूजा, हार, फुले किंवा दिखाऊ भक्ती नको. खरी भक्ती कृतीतून दिसली पाहिजे. फक्त देवापुढे दिवा लावणे, आरती करणे, हार घालणे याला मी भक्ती मानत नाही. कष्टाशिवाय काहीही मिळत नाही. फक्त बोलल्याने किंवा बाह्य दिखाव्याने यश मिळत नाही. बाहेरुन भक्तीचा आव आणणे, ढोंगीपणा करणे, संत किंवा साधू असल्याचे सोंग करणे याने काहीच साध्य होत नाही.
भजने, कीर्तने मोठी भक्ती दाखवता |
कामासाठी, सेवेसाठी दूरदूर पळता ||
त्याग जरा अंगी नाही, भोगची सारा |
आळशी लोकांचा मला न लागो वारा ||1||
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, लोक देवासमोर मोठमोठ्याने भजने, कीर्तन करतात आणि मी खूप मोठा भक्त आहे असं जगाला दाखवतात. समाजाची सेवा करायची वेळ आली, गाव स्वच्छ करायचं, गरीबांना मदत करायची वेळ आली की मात्र तुम्ही दूर पळून जबाबदारी टाळता. तुमच्या अंगात जरा देखील त्याग नाही. सुख-सुविधा, खाणे पिणे, आराम याचाच लोभ तुम्हाला आहे. समाजासाठी थोडा त्याग करायला शिका. अशा आळशी लोकांचा वारा ही मला लागू नये. मला असे ढोंगी भक्त अजिबात आवडत नाहीत.
पैसे मागोनिया जसे बांधता देऊळ |
तैसी गरीबांची मनी आहे का तळमळ ||
हेची सांगते का गीता? ग्रथ हा सारा |
आळशी लोकांचा मला न लागो वारा ||2||
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, लोकांकडून पैसे, वर्गणी गोळा करुन, देणग्या मागून भव्य देवळे, मंदिरे उभारता. देवळासाठी एवढी धडपड करता, पण भुकेल्या, नडलेल्या गरीब माणसासाठी कधी तळमळून मदत करायचा विचार केला आहे का? गीता आणि इतर धर्मग्रथामध्ये दगडाची पूजा सांगितली आहे का? की माणसाची सेवा करायला सांगितली आहे? अशा आळशी आणि ढोंगी लोकांचा वाराही मला लागू नये. दगडात देव शोधण्यापेक्षा माणसात देव शोधा. मंदिर बांधण्यापेक्षा माणसाचे पोट भरा. हिच खरी पूजा आहे.
नाकाहुनी शेंडीवरी चंदन लावावे |
काळ्या बाजाराने सारे लोक ठगवावे ||
दया नाही, माया नाही, स्वार्थची सारा |
आळशी लोकांचा मला न लागो वारा ||3||
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, डोक्याला शेंडी ठेविता आणि कपाळाला लांबलचक चंदनाचा टिळा लावता. असा बाह्य वेश धारण करुन लोकांना भुरळ पाडता. मी धार्मिक आहे असा दिखावा करता. गरीबांना महागाईत लुटायचे, साठेबाजी करुन जीवनावश्यक वस्तू महाग विकता. काळ्या बाजाराने सर्व लोकांना फसविता. तुमच्या मनात दया, माया नाही. फक्त स्वार्थच भरला आहे. दुसऱ्याच्या दुःखाची पर्वा न करता मला काय मिळेल हाच विचार तुमच्या डोक्यात भरला आहे. म्हणूनच मला आळशी, स्वार्थी आणि फसवेगिरी करणाऱ्या लोकांचा मला वाराही लागू नये.
गावामध्ये फिरती सदा जसे गावगुंड |
नाच तमाशांचे सारे जाहलेसे बंड ||
पुन्हा पाया लागावया येता सामोरा |
आळशी लोकांचा मला न लागो वारा ||4||
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, गावात नेहमी गावगुंडा सारखे तुम्ही फिरत असता. गावात नुसते दादागिरी करत, लोकांना लोकांना दमदाटी करत, भांडणे लावत हिंडतात. कामधंदा सोडून फक्त करमणूक, नाच, तमाशा, जुगार आणि दारु यातच दिवस घालवतात. त्यामुळे गावात सगळीकडे गोंधळ आणि वाईट चालीरीती पसरल्या आहेत. दिवसभर वाईट कृत्ये करता आणि संध्याकाळी देवळात जाऊन किंवा संतासमोर जाऊन महाराज माफ करा म्हणून पाया पडता. अशा आळशी आणि ढोंगी लोकांचा वाराही मला लागू नये. हाताने पाप आणि तोंडाने रामरनाम असे दुटप्पी वागणे महाराजांना मान्य नाही. आधी आचरण सुधारा मग देवाला सामोरे जा.
आतातरी घ्या वचन चारित्र्याने वागू |
सर्व गाव मिळोनिया सुमार्गाला लागू ||
तुकड्यादास म्हणे, यारे देश उद्धरा |
आळशी लोकांचा मला न लागो वारा ||5||
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, आजपर्यंत जे काही झाले ते झाले आतातरी शपथ घेऊन प्रामाणिकपणे, चांगल्या आचरणाने वागा. संपूर्ण गावाने एकत्र येऊन सन्मार्गाला लागा. भांडणे सोडून, एकजुटीने गावाच्या प्रगतीसाठी, स्वच्छतेसाठी, शिक्षणासाठी चांगल्या मार्गाने काम करु. महाराज म्हणतात, फक्त स्वतःचा विचार करु नका. गाव, समाज आणि देशासाठी काम करा. हाच खरा धर्म आहे. देशाचा उद्धार करा. मला स्वार्थी व आळशी लोकांचा वाराही लागू नये.

पुरुषोत्तम बैसकार, मोझरकर
व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार प्राप्त
श्री गुरुदेव प्रचारक यवतमाळ
फोन 9970404180