झाडी गावातील रेशन दुकानाची सखोल चौकशी होणार; रेशनकार्डधारकांना नियमित धान्य देण्याचे तहसीलदारांचे आश्वासन
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
बार्शी : मौजे झाडी, ता. बार्शी, जि. सोलापूर येथील रेशन दुकानामधून गरीब व गरजू नागरिकांना त्यांच्या हक्काचे धान्य वेळेवर मिळत नसल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर भीमक्रांती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेने या प्रश्नाची दखल घेत बार्शी तहसील कार्यालयात निवेदन सादर केले.
संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा सौ. स्वाती अविनाश धाईंजे यांनी आज बार्शी तहसील कार्यालयातील संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून झाडी गावातील रेशन दुकानाची सखोल चौकशी करण्यात यावी तसेच पात्र रेशनकार्डधारकांना त्यांच्या हक्काचे धान्य नियमित व वेळेवर मिळावे, अशी मागणी केली.
यावेळी झाडी गावातील नागरिक उपस्थित होते. नागरिकांच्या समस्यांबाबत संस्थापक अध्यक्षा सौ. स्वाती अविनाश धाईंजे यांची तहसीलदार शेख सविस्तर चर्चा झाली.
यावेळी तहसीलदारांनी झाडी गावातील रेशन दुकानाची सखोल चौकशी करून रेशनकार्डधारकांना धान्याचे नियमित वितरण करण्यात येईल, असे आश्वासन दिले. त्यामुळे अनेक दिवसांपासून त्यांच्या हक्काच्या धान्यापासून वंचित असलेल्या गरीब व गरजू नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
“वंचितांच्या हक्कासाठी भीमक्रांती बहुउद्देशीय सामाजिक संस्था सदैव तत्पर राहील,” अशी ग्वाही या निमित्ताने सौ. स्वाती धाईंजे यांनी दिली.