सदाशिवराव माने विद्यालयात अंधश्रद्धा निर्मूलन व्याख्यान व कार्यशाळा संपन्न
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 26/9/2026 : येथील सदाशिवराव माने विद्यालयात अंधश्रद्धा निर्मूलन, वैज्ञानिक दृष्टिकोन व तर्कशुद्ध विचार या विषयावरील व्याख्यान व प्रात्यक्षिक कार्यशाळा संपन्न झाली.

प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील व कै. रत्नप्रभादेवी मोहिते-पाटील यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.

प्रमुख व्याख्याते प्रा. रामलिंग सावळजकर यांनी विविध वैज्ञानिक प्रयोगांचे प्रात्यक्षिक सादर करून उपस्थितांची उत्सुकता वाढविली. होम-अग्नी प्रज्वलित होणे, केळीचे काप आपोआप होणे, उदबत्ती फिरणे, चेंडू कडक होणे, लंगर तोडणे, काडेपेटीतील काड्यांची संख्या अचूक ओळखणे तसेच संमोहन प्रक्रिया आदी प्रयोग सादर करून त्यामागील वैज्ञानिक कारणमीमांसा त्यांनी स्पष्ट केली. अंधश्रद्धा निर्मूलनाबरोबरच वैज्ञानिक दृष्टिकोन, तर्कशुद्ध विचारसरणी आणि समाजजागृती याबाबत त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष, विद्यालयाचे मुख्याध्यापक अमोल फुले यांनी प्रास्ताविकाद्वारे समाजातील श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातील फरक स्पष्ट करत विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारून जागरूक नागरिक बनण्याचे आवाहन केले.
यावेळी उपमुख्याध्यापक दत्तात्रय घंटे, पर्यवेक्षक राजेंद्र धोत्रे, सुजित कांबळे, शिक्षक प्रतिनिधी संजय राऊत, कल्पना मोरे यांच्यासह विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप शिंदे यांनी केले, तर आभार दादा ढोले यांनी मानले.