मनाची शुद्धता
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 07/03/2026 :
समाजात सध्या गहन प्रश्न म्हणजे प्रदूषण.
आपल्या वाईट सवयीतून दैनंदिन जीवनात आपण अनेक प्रकारचे प्रदूषण करतो. एकंदर आकडेवारी समोर आली की सरकार काय करते? असा सरकारला दोष देऊन मोकळे होतो.
अनावश्यक वेळी गाड्यांचे हॉर्न वाजवून, कर्णकर्कश्य, मोठ्या आवाजातील गाणी लावून, फटाके फोडून मिरवणुका, रात्रीच्या शांत वेळी फटाके वाजवून वाढदिवस हे सर्व कोण करते? विनाकारण आरडाओरडा कोण करते?
पाण्यात कचरा, रासायनिक कारखान्यातील पाणी, सांडपाणी कोण सोडते? नको असलेले अन्न, कपडे, चिखल, राडा-रोडा पाण्यात सोडणारे आपणच ना? कचरा इकडे तिकडे टाकणारे कोण? कोण करते मग प्रदूषण?
आपण प्रत्येकाने जाणीवपूर्वक आपल्या वाईट सवयी बदलल्या पाहिजेत. दुसऱ्याकडे बोट दाखवण्यापूर्वी आत्मनिरीक्षण केले पाहिजे. अगोदर स्वतःला घडवू मग दुसऱ्यांना शिकवू.
आजचा संकल्प
माझ्याकडून वैयक्तिक पातळीवर जल-वायू-ध्वनी प्रदूषण होणार नाही, मी वाईट व नकारात्मक विचारांची पेरणी करून वैचारिक प्रदूषण करणार नाही असा संकल्प करू व भविष्यातील प्रदूषण टाळू.
सौ. स्नेहलता स. जगताप.