काहे पीता है शराब ?
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 03/05/2026 :
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी आपल्या खंजेरी भजनाच्या माध्यमातून समाजातील अंधश्रद्धा, जातीभेद आणि व्यसनाधीनतेवर प्रखर प्रहार केले आहेत. त्यांचे भजन समाज प्रबोधनाचे एक मोठे साधन होते. महाराज व्यसनाला मानवी प्रगतीतील मोठा अडथळा मानून ते सोडण्याचे आवाहन करतात. ग्रामगीतेच्या विविध अध्यायामध्ये त्यांनी आत्मसंयमन आणि आरोग्य या विषयावर लिहिताना व्यसनमुक्त समाजाची कल्पना मांडली आहे. महाराज मानवी जीवनाला मूल्याधिष्ठित जगण्याचा संदेश देतात.
काहे पीता है शराब, काहे पीता है शराब?
धन भी गमावे, इज्जत न पाये |
कुल बदनाम कराये ||टेक||
राष्ट्रसंत म्हणतात तू दारू का पितोस? कशासाठी दारू पितोस? तू दारू पिण्याचे कारण काय? दारूमुळे तू पैसा गमावतोस, मान, सन्मान (प्रतिष्ठा) मिळत नाही आणि संपूर्ण कुळाची (कुटुंबाची) बदनामी करतोस. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज दारू पिण्याचे दुष्परिणाम सांगून व्यसन न करण्याचा सल्ला या भजनातून देत आहेत. दारूमुळे माणसाचे आर्थिक नुकसान होते, समाजात इज्जत जाते आणि कुटुंबाचे नाव खराब होते. यातून माणसाने दारू पासून दूर राहिले पाहिजे असा बोध मिळतो.
मानव का बडा दुश्मन, बिगडाता सरासर खून |
इसकी बडी बुरी है धून |
कैसे तुझे समझावे? कौन गति पाये |
कुल बदनाम कराये ||1||
जसा माणसाचा सर्वात मोठा शत्रू क्रोध आहे. राग आल्यावर माणसाचे विचारावरील नियंत्रण सुटते. तसेच दारू माणसाचा खरा दुश्मन आहे कारण दारू केवळ शारीरिक आरोग्यच नाही तर मानसिक, आर्थिक आणि सामाजिक जीवनही उध्वस्त करते. रागामुळे शरिरातील रक्त गरम होते आणि माणूस चुकीचे निर्णय घेतो. त्याला दारूची धून, सवय लागते. दारूच्या आहारी गेल्यामुळे माणसाची विवेकबुद्धी नष्ट होते. राष्ट्रसंत म्हणतात तुला कसे समजावू की या दारूने तुझे आयुष्य उद्वस्त होईल? दारू पिणे बंद कर नाही तर तुझे कुळ बदनाम होईल.
काबू में नहीं है मन, बिगडाता सभी जन-गण |
गाली बकता सदा पल-छल |
घर सारा दुःख पाये, जात सताये |
कुल बदनाम कराये ||2||
ज्याचे मनावर नियंत्रण नसते, तो माणूस सतत अपशब्द वापरून घर आणि समाजातील लोकांचे जीवन दुःखी करतो. अशा अनियंत्रीत वर्तनामुळे कुटुंबाची बदनामी होते आणि मानहानी सहन करावी लागते. दारूमुळे मन आणि शरिराचा ताळमेळ बिघडतो. मद्यपान केल्यानंतर व्यक्तीची विचार करण्याची, समजून घेण्याची आणि निर्णय घेण्याची क्षमता क्षीण होते. कुळ बदनाम करायचे नसेल तर दारू सोड.
सब घरदार भया कंगाल, पुत्रोंके हुये बेहाल |
तुकड्या कहता जरा दे ख्याल |
तेरा पिना छुट जाये, सुख घर आये |
कुल बदनाम कराये ||3||
दारूच्या व्यसनामुळे संपूर्ण घरदार कंगाल (दरिद्री, भिकारी) झाले असून, मुलांची अवस्था अतिशय वाईट (बेहाल) झाली आहे. दारुवर अमर्याद पैसा खर्च केल्यामुळे घरची आर्थिक स्थिती खालावते, जमापुंजी संपते, कर्जाचा डोंगर उभा राहतो. कुटुंबातील कर्त्या व्यक्तीच्या व्यसनामुळे मुलांचे भविष्य अंधकारमय होते. मुलांचे शिक्षण सुटते. कुटुंबाला अन्नान्न दशा सोसावी लागते आणि मानसिक त्रासामुळे त्यांचे आयुष्य दुःखी होते. राष्ट्रसंत म्हणतात जरा विचार कर तुझी दारू पिण्याची सवय सुटून जाईल, तू दारू सोड. व्यसन सोडले तर तुझ्या घरात सुख नांदेल. जोपर्यंत दारू पितोस तोपर्यंत आपल्या कुळाची, कुटुंबाची, वंशाची बदनामी करत आहेस. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात.
सोड रे ! सोड दारूला |
ओळखी आपुल्या माणुसकीला ||
दररोज दारू पिण्यावर होणारा खर्च पाहिला तर रोज 300 रुपये खर्च केल्यास, महिन्यात 9000 हजार रुपये आणि वर्षाला 1,08,000 पेक्षा जास्त नुकसान होते. घरचा आर्थिक बजेट कोलमडून जातो. व्यसनामुळे कामावर परिणाम होतो. एकाग्रता कमी होते आणि शेवटी नोकरी किंवा व्यवसाय गमवावा लागतो. दारूची गरज पूर्ण करण्यासाठी लोक कर्ज घेतात. माणूस कर्जाच्या जाळ्यात अडकतो. पैसे नसतील तर घरातील वस्तू विकावे लागते. दारू पिण्याकरिता लागणारा खर्च सुरक्षित ठिकाणी गुंतविला तर भविष्य उज्वल होऊ शकते. मी दारू पिणार नाही असा दृढनिश्चय स्वतःला करा. व्यसनमुक्ती केंद्रात जाऊन औषधीचा सल्ला घ्या. दारू पिण्याची इच्छा झाल्यास व्यायाम, ध्यान किंवा आवडीच्या कामात लक्ष गुंतवा. व्यसन योग्य उपचार आणि मानसिक आधाराने बरा होऊ शकतो. मद्यपान पूर्णपणे थांबवणे हाच यावरचा सर्वात प्रभावी उपाय आहे.

पुरुषोत्तम बैसकार, मोझरकर
व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार प्राप्त
श्री गुरुदेव प्रचारक यवतमाळ
फोन- 9921791677