📖✒️स्क्रीनवरची बोटे आणि हरवलेला जिव्हाळा.✍️
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 23/05/2026 :
काही दिवसांपूर्वी घराची लाईट गेली आणि मोबाईलची बॅटरीही संपली. नाईलाजाने मी गॅलरीत येऊन उभा राहिलो. समोरून एक जुने ओळखीचे आजोबा जात होते. नेहमी मोबाईलमध्ये मान घालून निघून जाणारा मी, त्या दिवशी त्यांच्याकडे बघून मनापासून हसलो. त्यांनीही थांबून आपुलकीने चौकशी केली आणि गप्पा केल्या. पण त्या ५ मिनिटांच्या प्रत्यक्ष संवादाने मनाला जे समाधान दिले, ते व्हाट्सॲपचे हजारो ‘इमोजी’ वर्षभरातही देऊ शकत नाहीत.
तेव्हा मला प्रकर्षाने जाणवलं की आपल्या “बोटांना काम मिळाले, तोंडाचे काम कमी झाले. शब्द मुके झाले आणि मोबाईल मधे लपून बसले.
आज आपले आयुष्य एका ५ इंचाच्या स्क्रीनमध्ये आटले आहे. सकाळी ‘GM’ पासून रात्रीच्या ‘GN’ पर्यंत आणि वाढदिवसाच्या शुभेच्छांपासून ते भावपूर्ण श्रद्धांजली पर्यंत. सगळं काही एका क्लिकवर चालले आहे. या तंत्रज्ञानाने फायदा तर केलाच कारण त्यानेच बँकेच्या लाईन्स कमी केल्या, तिकिटांचा त्रास वाचवला; पण माणसांमधील भेटीचे निमित्तच हिरावून घेतले. त्यात अजून भर म्हणून दूधाची तहान ताकावर भागवायला, वेगवेगळ्या इमोजी धावून येतात मदतीला. आज आपण चेहऱ्यावरील खरे भाव विसरून, पिवळ्या रंगाच्या कृत्रिम इमोजीमध्ये भावना शोधत आहोत.
आभासी जगात आपण हजारो लोकांशी कनेक्टेड आहोत, पण प्रत्यक्षात मात्र प्रचंड एकटे आहोत. कारण, मोबाईलवर टाईप होणाऱ्या शब्दांना भावनांचा ओलावा नसतो. ते शब्द वाचले जातात आणि डिलीट होतात; मनात साठवले जात नाहीत.
म्हणूनच, “आभासी जगातले संवादही आभासी, अशा संवादांचा आनंद नाही..
मग प्रश्न पडतो की माणूस खरंच पुन्हा हृदयापासून संवाद साधेल का?
याचे उत्तर आपल्याच हातात आहे. जेव्हा आपण जेवताना मोबाईल बाजूला ठेवून एकमेकांकडे बघून बोलू, मित्राला मेसेज करण्याऐवजी थेट फोन करून त्याचा आवाज ऐकू, आणि एखाद्याच्या सुखा-दुःखात फक्त फॉरवर्डेड मेसेज न पाठवता प्रत्यक्ष धावून जाऊ. तेव्हा संवाद पुन्हा जिवंत होईल.
चला, बोटांना थोडी विश्रांती देऊया आणि ओठांना, कानांना पुन्हा एकदा माणसाच्या खऱ्याखुऱ्या शब्दांची सवय लावूया.
©ShradDhanesh’s Dairies
संकलन : प्रविण सरवदे, कराड
.