PDF चा फुल फॉर्म माहिती आहे का?
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
संकलन :आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 4/8/2026
तुम्ही आयुष्यात हजारो वेळा PDF फाइल्स पाठवल्या आणि उघडल्या असतील. कागदपत्रांसंबंधी कामांसाठी, प्रेझेंटेशनसाठी पीडीएफ फाइल्सचा रोज वापर केला जातो. पीडीएफ फाइल्स रोजच्या कामांचा मोठा भाग आहे. पण PDF (PDF Full Form) चा नेमका पूर्ण अर्थ काय आहे, हे तुम्हाला माहिती आहे का? अनेकांना याचं उत्तर माहिती नसतं. आज PDF हा शब्द इतका सर्वसामान्य झाला आहे की, आपण तो Wi-Fi किंवा GPS सारखाच सहजपणं वापरतो.
कधी झाली सुरूवात?
PDF ची सुरुवात 1991 मध्ये झाली. Adobe Systems चे सह-संस्थापक जॉन वॉर्नॉक यांनी “Camelot” नावाचा प्रकल्प सुरू केला. त्यामागील उद्देश असा होता की, कोणत्याही डिव्हाइसवर कोणताही दस्तऐवज अगदी तसाच दिसावा. त्यानंतर 1993 मध्ये Adobe Acrobat सोबत PDF 1.0 बाजारात आले आणि पुढे ते जगातील सर्वात लोकप्रिय फाइल फॉरमॅटपैकी एक बनले.
पीडीएफचा पूर्ण अर्थ काय?
PDF चा पूर्ण अर्थ Portable Document Format असा होतो. “Portable” हा शब्द येथे सर्वात महत्त्वाचा आहे. कारण, हा फॉरमॅट कोणत्याही संगणक, ऑपरेटिंग सिस्टीम किंवा मोबाईल डिव्हाइसवर उघडला, तरी दस्तऐवजाचा मूळ लेआउट, फॉन्ट, चित्रे आणि फॉरमॅटिंग बदलत नाही.
एक्सपर्ट सांगतात, PDF लोकप्रिय होण्यामागे अनेक कारणं आहेत. हा फॉरमॅट कागदपत्रांचे मूळ स्वरूप कायम ठेवतो, इंटरनेटवर सहज शेअर करता येतो, कमी इंटरनेट स्पीडवरही उघडता येतो आणि त्यातील मजकूर सर्चही करता येतो. त्यामुळे पुस्तक प्रकाशनापासून ते कार्यालयीन कामांपर्यंत PDF चा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो.
विशेष म्हणजे, PDF हा आता केवळ तांत्रिक शब्द राहिलेला नाही. अनेकजण दैनंदिन संभाषणात “मला PDF पाठव”, “हे PDF करून दे” अशा प्रकारे त्याचा वापर करतात. इंग्रजी भाषेत तर PDF हा शब्द क्रियापदाप्रमाणेही वापरला जाऊ लागला आहे.
आज PDF हा जगभरात जवळपास प्रत्येक देशात आणि प्रत्येक भाषेत ओळखला जाणारा डिजिटल शब्द बनला आहे. गेल्या तीन दशकांमध्ये अनेक तांत्रिक व्याख्या बदलल्या, मात्र PDF आजही तितकाच महत्त्वाचा आणि विश्वासार्ह फाइल फॉरमॅट मानला जातो.