“व्यभिचारी स्त्रिया आणि आंबटशौकीन पुरुष यांच्यामुळेच आज समाजात विकृती वाढलेली आहे”- तृप्ती पाटील
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे, अकलूज.
दिनांक 09/02/2026 : “व्यभिचारी स्त्रिया आणि आंबटशौकीन पुरुष यांच्यामुळेच आज समाजात विकृती वाढलेली आहे. या स्त्री-पुरुषांमुळे समाज अधोगतीकडे चालला आहे”. असे मत या लेखाच्या आरंभीच लेखिका तृप्ती पाटील, मुंबई यांनी व्यक्त केले आहे. लेखाची सविस्तरपणे मांडणी करताना त्यांनी पुढील प्रमाणे मुद्दे नमूद केले आहेत.
आज अनेक बायका सोशल मीडियावर नग्न-उघडे व्हिडिओ तयार करतात आणि त्यांना आंबटशौकीन पुरुष लाईक व कमेंट्स देतात. या लाईक-कमेंट्समुळे त्या बायकांना अधिक पैसा मिळतो, म्हणून त्या आणखी उघडे-नग्न व्हिडिओ बनवतात. पैशासाठी त्या स्त्रिया स्वतःची इज्जत, आपल्या आई-वडिलांची इज्जत आणि समाजातील सन्मान दावणीला लावतात.
पण या सगळ्याला पाठिंबा कोण देतो? तर हेच आंबटशौकीन पुरुष. या स्त्रिया आणि पुरुष मिळून समाजासमोर आपली संपूर्ण इज्जत विकतात आणि समाजात विकृती निर्माण करतात. ही विकृती इतकी भयानक आहे की तिच्यामुळे समाज वाममार्गाकडे गेला आहे. लहान-लहान मुलं चुकीच्या मार्गाला लागली आहेत. स्त्रिया-पुरुष व्यभिचारी होत चालले आहेत. घटस्फोटासारखी प्रकरणे वाढत आहेत, लिव्ह-इन रिलेशनशिप्स वाढत आहेत.
या बायकांनी जरी स्वतःची इज्जत विकली असली, तरी समाज आता चांगल्या स्त्रीकडेही त्याच नजरेने पाहू लागला आहे. लाईक आणि कमेंट्ससाठी सोशल मीडियावर जो घाणेरडा व्यवहार सुरू आहे, त्याचे परिणाम आज नाही तर उद्या या स्त्रियांना आणि आंबटशौकीन पुरुषांना भोगावेच लागतील. कारण ही माणसं समाजाला विकृतीकडे नेत आहेत.
सोशल मीडियामार्फत जो पैसा हे लोक कमावत आहेत आणि विकृती पसरवत आहेत, तोच पैसा काही वर्षांनंतर त्यांचा घात करेल. ज्या सौंदर्याच्या जोरावर या स्त्रिया समाजात विकृती निर्माण करतात, तेच सौंदर्य एखाद्या आजाराच्या विळख्यात अडकून नष्ट होईल. आणि जे आंबटशौकीन पुरुष या बायकांना पाठिंबा देतात, तेही भविष्यात आजारांच्या विळख्यात सापडतील.
कारण हा ईश्वराचा नियम आहे—जसे कर्म तसे फळ. व्यभिचार करणे, सोशल मीडियावर नग्न-उघडे व्हिडिओ टाकणे आणि त्याला पाठिंबा देऊन समाजात विकृती निर्माण करणे हे फार मोठे पाप आहे. या पापाची शिक्षा ईश्वर या लोकांना देणारच.
ज्या दिवशी समाजात या लोकांची किंमत कमी होईल, त्यांचा मानसन्मान नष्ट होईल, त्या दिवशी त्यांना कळेल की आपण किती मोठे पाप केले. पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली असेल. हातात उरेल ती फक्त चार भिंतींची खोली, आजारांचा विळखा आणि भोवती एकही माणूस नसलेले एकाकी आयुष्य.
म्हणून सुधरा जरा…समाजात विकृती पसरवू नका. विकृती सुरुवातीला उसासारखी गोड आणि आकर्षक वाटते, पण नंतर तोच ऊस विष बनून माणसाचे शरीर पोखरतो आणि मृत्यूनंतर भयानक नरकयातना देतो.
शेवटी मृत्यू कधी ना कधी येणारच आहे. तुम्ही जे कर्म केले असेल, त्याची शिक्षा ईश्वर नक्की देणार—हे लक्षात ठेवा.
शब्दांकन : लेखिका तृप्ती पाटील, मुंबई ✍️