⭕ मंगळसूत्र उतरवायला लावणारी परीक्षा
💢 ही परीक्षा नाही, हा स्त्रीच्या आत्मसन्मानावरचा घाला आहे!
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे, अकलूज.
दिनांक 09/02/2026 :
छत्रपती संभाजीनगरमध्ये सीटीईटी परीक्षेच्या नावाखाली जे घडले, ते केवळ चुकीचे नाही, तर धक्कादायक, संतापजनक आणि लाजिरवाणे आहे. फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ९.३० ते १२.३० या वेळेत केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा होती. मात्र, परीक्षार्थींना सकाळी ७–८ वाजताच परीक्षा केंद्रावर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते.
प्रवेशद्वारावर सुरक्षा तपासणीच्या नावाखाली ‘कोणतेही मेटल साहित्य आत नेता येणार नाही’ अशी सक्ती करण्यात आली. इथपर्यंत सगळं ठीक.
मात्र, याच नियमाचा गैरवापर करत महिला उमेदवारांना गळ्यातील मंगळसूत्र, कानातील व नाकातील दागिने काढायला भाग पाडण्यात आले.
स्पष्ट शब्दांत सांगण्यात आले, मंगळसूत्र काढले नाही तर परीक्षा देऊ देणार नाही!. एक नव्हे अनेक केंद्रांवर हा प्रकार घडला. महिलांना अक्षरशः गेटवर अडवून ठेवण्यात आले. ज्यांच्यासोबत नातेवाईक होते त्यांनी त्यांच्याकडे मंगळसूत्र दिले.
ज्यांच्यासोबत कोणी नव्हते, त्या महिलांची प्रचंड तारांबळ उडाली.
सीटीईटीसारख्या राष्ट्रीय पातळीवरील परीक्षेच्या नावाखाली छत्रपती संभाजीनगरमध्ये जे घडले, ते केवळ धक्कादायक नाही तर संतापजनक आहे. महिलांना परीक्षा केंद्रात प्रवेशासाठी गळ्यातील मंगळसूत्र काढण्यास भाग पाडणे म्हणजे केवळ अतिरेक नव्हे, तर स्त्रीच्या श्रद्धा, संस्कृती आणि आत्मसन्मानावर थेट आघात आहे.
मंगळसूत्र हा काही दिखाव्याचा दागिना नाही. तो स्त्रीच्या आयुष्यातील अत्यंत पवित्र आणि भावनिक प्रतीक आहे. तो तिच्या वैवाहिक आयुष्याचा, संस्कृतीचा आणि अस्मितेचा अविभाज्य भाग आहे. आणि अशा पवित्र दागिन्याला ‘कॉपीचे साधन’ समजून उतरवायला लावणं ही केवळ प्रशासनाची असंवेदनशीलता नाही, तर बुद्धिहीनतेचा कळस आहे.
—
सुरक्षेच्या नावाखाली असंस्कृत दडपशाही!
सुरक्षा तपासणी आवश्यक आहे, याबाबत कोणाचाही आक्षेप नाही. मात्र, सुरक्षेच्या नावाखाली महिलांचा अपमान करणारी, त्यांना मानसिक त्रास देणारी आणि अपमानास्पद वागणूक देणारी यंत्रणा कोणत्या कायद्यात बसते?. आज महिलांना सांगितले जातंय, ‘मंगळसूत्र काढा, नाहीतर परीक्षा देऊ देणार नाही!’.
हा आदेश आहे की धमकी?
ही परीक्षा आहे की संस्कृतीची शिक्षा?
ज्या देशात स्त्रीला देवी मानले जाते, तिच्या सौभाग्यचिन्हालाच संशयाच्या नजरेने पाहिले जाते हा किती मोठा विरोधाभास आहे!
—
‘हिंदुत्व’ आणि ‘संस्कृती’च्या घोषणा, आणि प्रत्यक्षात स्त्रीचा अपमान
‘संस्कृती वाचवा’, ‘हिंदुत्व जपा’ अशा घोषणा देणाऱ्या सत्ताधाऱ्यांच्या राज्यात महिलांना मंगळसूत्र उतरवून परीक्षा द्यायला भाग पाडले जाते, हा फार मोठा ढोंगीपणा नाही का?. प्रशासनाला मंगळसूत्र आणि कॉपी यातील फरक कळत नसेल, तर ही केवळ प्रशासनाची अकार्यक्षमता नाही ही संवेदनशीलतेची भीषण अपयशगाथा आहे. अनेक महिलांना सोबत नातेवाईक नव्हते. त्यांनी मंगळसूत्र कुठे ठेवायचे? कोणाकडे द्यायचे? चोरीचा, हरवण्याचा धोका? या सगळ्या प्रश्नांची जबाबदारी कुणाची?.
मुळात, एका महिलेची परीक्षा आधीच कठीण असते. सामाजिक, कौटुंबिक, आर्थिक अडचणींशी झुंज देत ती परीक्षा केंद्रापर्यंत पोहोचते. आणि तिथे पोहोचल्यावर तिच्या श्रद्धेवर घाला घालून मानसिक छळ केला जातो. ही परीक्षा व्यवस्थेची क्रूरता नाही का?
सरकार आणि प्रशासनाला थेट प्रश्न विचारावे वाटते..
मंगळसूत्रात कोणते कॉपीचे तंत्रज्ञान बसवलेले असते?
बांगड्या, नथ, कुंकू, टिकली यावरही बंदी घालणार का?
उद्या महिलांना कपाळावरील कुंकूही पुसायला सांगणार का?
जर सुरक्षा तपासणीच उद्दिष्ट असेल, तर स्कॅनर, मेटल डिटेक्टर, महिला सुरक्षारक्षक यांचा वापर का केला जात नाही?
ही परीक्षा नाही, ही स्त्रीच्या प्रतिष्ठेची परीक्षा आहे
आज मंगळसूत्र उतरवायला सांगितले गेले, उद्या अजून काय उतरवायला सांगाल?
ही केवळ परीक्षा केंद्रावर घडलेली घटना नाही. हा स्त्रीच्या स्वाभिमानावरचा थेट हल्ला आहे.
याचा तीव्र निषेध झाला पाहिजे. जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे महिलांच्या श्रद्धा, भावना आणि अस्मितेचा आदर करणारी परीक्षा व्यवस्था उभी राहिली पाहिजे.
कारण परीक्षा पास होणे महत्त्वाचे असले, तरी स्वाभिमान जपणे त्याहून कितीतरी अधिक महत्त्वाचे आहे.
तुषार विष्णू वखरे
मो: 9881177933