माळशिरस पंचायत समिती मधील वरिष्ठ सहाय्यकास लाच घेताना अटक
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 23/02/2026 :
सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुका पंचायत समिती मधील वरिष्ठ सहाय्यक सुंदरराव नागटिळक (वय 56) यांना पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे पथकाने रंगेहात पकडले.
तक्रारदार यांनी धर्मपुरी येथील सभा मंडपाचे काम पूर्ण करून त्याचे बिल संबंधित कार्यालयाकडे सादर केले होते. बिल पुढील प्रक्रियेसाठी पंचायत समितीकडे आल्यानंतर काम पूर्ण झाल्याचा दाखला मिळवून देण्यासाठी दहा हजार रुपयांची लाचेची मागणी करण्यात आल्याची तक्रार होती. तक्रारीनंतर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी करून सापळा रचला.
आज दुपारी सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास पंचायत समिती कार्यालयात तडजोडीनंतर पाच हजार रुपये स्वीकारताना नागटिळक यांना रंगेहात अटक करण्यात आली.
दरम्यान, या प्रकरणात गटविकास अधिकारी यांच्या भूमिकेबाबत अधिकृत माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही. मात्र दाखला देण्याची प्रक्रिया त्यांच्या कार्यालयाशी संबंधित असल्याने त्यांच्या भूमिकेबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. अधिकृतरीत्या त्यांच्यावर कोणतीही कारवाई झालेली नसली तरी चौकशीची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे गटविकास अधिकाऱ्यांवरही संशयाची टांगती तलवार असल्याची चर्चा तालुक्यात रंगू लागली आहे.
सदर प्रकरणाचा पुढील तपास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडून सुरू असून संबंधितांवर कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू आहे.