कायम टिकणारी गोष्ट एकच ती म्हणजे
स्वभाव आणि माणुसकी
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 22/02/2026 :
स्वभाव म्हणजे व्यक्तीची वर्तणूक, विचारसरणी तर माणुसकी म्हणजे निस्वार्थ प्रेम, दया, करुणा आणि संकटात दुसऱ्याला केलेली मदत. स्वभाव व्यक्तीमत्व दर्शवतो (उदा- शांत, रागीट) तर माणुसकी हा माणसाचा खरा अलंकार आहे. जो संकटात इतरांच्या उपयोगी पडतो. चांगला स्वभाव आणि माणुसकीच माणसाला खरे माणूस बनवते. स्वभावाला प्रवृत्ती असेही म्हणतात. स्वभाव हा माणसाच्या आतून आलेला गुणधर्म असतो, तो सहसा बदलत नाही. जरी स्वभाव जन्मजात असला तरी शिक्षण, अनुभव आणि वातावरणातून तो परिपक्व किंवा विकसित होऊ शकतो.
हृदयाचा जो सरळ असे |
ज्यावर सगळे लोभ करी |
नम्र सदा सेवेला तत्पर |
मोह न ज्या अपुला कसला ||
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे हे भजन मानवी स्वभावातील सरळपणा, नम्रता, निस्वार्थी सेवेचे महत्व सांगणारे आहे. महाराज म्हणतात, ज्या माणसाचे हृदय निखळ आणि सरळ आहे, ज्याच्या मनामध्ये कपट नाही अशा व्यक्तीवर सर्वजण प्रेम करतात. जो व्यक्ती नेहमी नम्र असतो आणि दुसऱ्यांची सेवा करण्यासाठी तत्पर असतो, ज्याला कशाचाही मोह, अहंकार, लोभ नाही तोच खरा माणूस आहे. हे भजन मानवी जीवनाला सरळ मार्गांवर चालण्याची प्रेरणा देते.
स्वभाव ही एक अत्यंत मोलाची बाब आहे. मानवी जीवनात भौतिक गोष्टी, संपत्ती किंवा शरीर कायम टिकत नाही पण माणसाचा सुस्वभाव आणि माणुसकी कायम स्मरणात राहते आणि चिरकाल टिकते. माणसाच्या निधनानंतर त्याची संपत्ती नाही तर त्याचे विचार, माणुसकी आणि लोकांच्या मनातील आदराची भावनाच जीवंत राहते. आपण माणूस म्हणून जन्मलो तर माणुसकीने जगू या. स्वभाव स्वार्थी असू शकतो पण माणुसकी सदैव निस्वार्थ असते. स्वभाव आपली ओळख आहे आणि माणुसकी आपली खरी श्रीमंती आहे.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची माणुसकी ही “मानव सेवा हीच ईश्वर सेवा” या तत्वावर आधारित होती. जिथे त्यांनी जातिभेद, अंधश्रद्धा आणि जातियता नाकारून सर्व धर्म समभावाचा मार्ग दाखवला, समाजातील सर्व घटकांचा विकास आणि पिडीतांची सेवा हे त्यांच्या माणुसकीचे मुख्य केंद्रबिंदू होते. महाराजांनी माणुसकीला सर्वात मोठा धर्म मानले आणि मानवतेच्या कल्याणासाठी आपले आयुष्य वेचले. दुःखीतांची सेवा (बंगालचा दुष्काळ 1945), चिन युद्ध 1962, कोयना भुकंपाच्या वेळी त्यांनी प्रत्यक्ष जाऊन पिडीतांची सेवा केली. जातीधर्मातील भेदभाव दूर करण्यासाठी त्यांनी सर्वधर्मीय सामुदायिक प्रार्थनेचा पुरस्कार केला. खेड्यांचा विकास घडवून आणण्यासाठी ग्रामविकासाचा संदेश दिला. स्त्रीला दास्यातून मुक्त करून समाजात समान हक्क मिळून देण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले.
माणसाने माणसाशी माणसासारखे वागणे म्हणजेच माणुसकी. जसे माणूस म्हणून इतरांनी आपल्या सोबत वागावे वाटतं तसच आपणही इतरांसोबत वागले पाहिजे हे कळलं की माणुसकी कळेल. माणुसकी ही माणसाच्या नसानसांमध्ये भरलेली असली पाहिजे. उदा:- एकदा अब्राहम लिंकन यांना त्यांच्या घोडागाडीतून जाताना एक लहान कुत्र्याचे पिल्लू एका घाण पाण्याच्या नालीत पडलेले दिसले. पिल्लू बाहेर येण्यास तडफडत होते. त्यांनी गाडी थांबवली. कुत्र्याचे पिल्लू बाहेर काढले आणि पुन्हा गाडीत बसले. त्यांचे कपडे घाण झाले होते आणि ते संसदेत चाललेले होते. त्यांचे सहकारी म्हणाले, तुम्ही त्या कुत्र्यास मदत केली. लिंकन म्हणाले, मी मदत केली नसती तर माझे मन कायम मला दोष देत राहिले असते. आता माझे मन खूप आनंदी आहे. आपण कुणासाठी काही केले तर आपल्या मनाला आनंद होत असेल तर तीच खरी माणुसकी.
स्वभावाला औषध नाही या म्हणीप्रमाणे व्यक्तीच्या वर्तणुकीची ही एक मूलभूत आणि स्थिर बाजू आहे. षड़विकारावर स्वभाव अवलंबून असतो. आपला स्वभाव लहानपणी, यौवनात, मध्यम वयात, वृद्धपणात वेगवेगळा असतो. मनुष्य भरती ओहटी प्रमाणे जगत असतो. तो कुठल्या क्षणी कसा वागेल, काय बोलेल याचे त्यालाच भान नसते. विक्षिप्त स्वभाव म्हणजे प्रवाहाचे उलट्या दिशेने चालणे. मी म्हणतो तेच खरे. समोरच्या व्यक्तीचा काडीमात्र विचार न करता वागणे. चंचल स्वभाव हा मनाचा स्थायीभाव आहे. “मन वढाय वढाय” बहिणाबाई म्हणतात. मनाला वठणीवर आणण्याचा प्रयत्न केला तर आपोआपच आपल्या स्वभावात फरक पडत जातो. अतिविचारी स्वभाव सुद्धा शरीरासाठी घातक आहे. काही लोक घुमा स्वभावाचे असतात. ते स्वतःचे मनानेच करतात. आपण चार प्रकारचे स्वभाव पाहू या.
1) सात्विक स्वभाव:- हा स्वभाव शांत, दयाळू, करुणामय असतो. सात्विक स्वरुपाच्या व्यक्ती प्रेम, सहानुभूती आणि समजूतदारपणे वागतात. 2) राजसिक स्वभाव:- हा स्वभाव महत्वाकांक्षी, सक्रीय आणि साहसी असतो. राजसिक स्वभावाच्या व्यक्ती यश मिळविण्यासाठी आणि जगावर प्रभाव पाडण्यासाठी उत्सुक असतात. 3) तामसिक स्वभाव:- हा स्वभाव लोभ, क्रोध आणि अहंकाराने भरलेला असतो. तामसिक स्वभावाच्या व्यक्ती भौतिक सुख सुविधा आणि शक्ती, यश मिळविण्यासाठी उत्सुक असतात. 4) सत्कार्य स्वभाव:- हा स्वभाव इच्छेने आणि विचाराने शुद्ध असतो. सत्कार्य स्वभावाच्या व्यक्ती सत्य, शांतता आणि न्यायासाठी कार्य करतात. सात्विक स्वभाव हा सर्वात उत्तम मानला जातो तर तामसिक स्वभाव हा सर्वात वाईट मानला जातो.

पुरुषोत्तम बैसकार, मोझरकर
श्री गुरुदेव प्रचारक यवतमाळ
फोन- 9970404180