प्रार्थितो संत-साधूंना, शक्ती द्या बुद्धी द्या लोका !
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 25/9/2026 :
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी आपल्या ग्रामगीता ग्रंथात आणि विचारांतून सामुदायिक प्रार्थनेचे महत्व सांगताना मानवी ऐक्य, राष्ट्रीय सलोखा आणि ग्रामविकासाचा संदेश दिला आहे. राष्ट्रसंत प्रार्थना या विषयावर बोलताना म्हणतात, आज आपण येथे जमलो आहोत. तो विषय आपल्या सर्वांच्या आध्यात्मिक आणि सामाजिक जीवनाचा पाया आहे. तो म्हणजे सामुदायिक प्रार्थना. माणसाच्या जीवनात परमार्थ हवा, पण तो भेदभाव रहित असावा. जाती-पाती, पंथ आणि धर्माच्या कुंपणात अडकलेला समाज एकत्र आणण्यासाठी सामुदायिक प्रार्थना आणि सर्वधर्म समभावाचा जोरदार पुरस्कार केला. प्रार्थना म्हणजे आपल्या अंत:करणाची शुद्धी आणि ईश्वराशी एकरूप होण्याचा प्रयत्न आहे. प्रार्थनेला सर्व जाती, जमाती आणि विचारांचे लोक एकाच आसनावर एकत्र येतात. सर्व गावकरी, समाज एकत्र येऊन एकाच स्वरांत ईश्वराची प्रार्थना करतो. तेव्हा गावात एकोप्याची, बंधुभावाची गंगा वाहू लागते.
प्रार्थितो संत-साधूंना, शक्ती द्या बुद्धी द्या लोका |
जाहला देश दुर्बल हा, लाज राखा न घ्या शंका ||धृ||
राष्ट्रसंत प्रार्थना करताना स्वतःसाठी काही मागत नाही. ते संताला, देवाला म्हणतात, लोकांना शक्ती आणि बुद्धी द्या. आपण देवाकडे गाडी, बंगला, लग्न होऊ द्या हेच मागत असतो. उदा- एखादा माणूस खूप हुशार आहे. त्याला सगळ कळतं की चांगल काय अन् वाईट काय. पण उठून काही करायची शक्तीच नाही, आळशी आहे. मग त्या बुद्धीचा काय उपयोग? म्हणून राष्ट्रसंत शक्ती, काम करण्याची ताकद, कष्ट करण्याची हिंमत आणि बुद्धी द्या म्हणतात. महाराज म्हणतात, शक्ती आणि बुद्धी नसल्यामुळे हा देश दुर्बल झाला आहे. इंग्रजांनी लुटलं, अंधश्रद्धेने कमकुवत केला. आळसाने कमकुवत केला. आता तुम्हीच लाज राखायची आहे. लाज राखा म्हणजे अब्रू वाचवा. शंका घेऊ नका. संशय घेऊ नका. लगेच मदतीला धावून या. उदा- एखादा घरातला मोठा मुलगा वाईट संगतीला लागून दुर्बल झाला, आजारी पडला तर आई वडील त्याची लाज राखतात. लोकांना उठसूठ सांगत नाही, त्याला सुधारतात. तसेच संतांनी म्हटले आहे की हा भारत देश तुमचा मुलगा आहे तो दुर्बल झाला आहे आता तुम्हीच त्याची लाज राखा. देश कधी काळी सोन्याची चिडियाँ होता. आज दुर्बल झाला आहे. देशातील लोकांना शक्ती आणि बुद्धी द्या.
अजवरी संत साधूंनी, जगविला देश बांधूनी |
पुन्हा ती वेळ दिसता हे, समजूनी साथ द्या रंका ||1||
आजपर्यंत संत आणि साधूंनीच उपदेश करून, बोध करून या देशाला जगवलं आहे. हा देश तलवारीने नाही जगला, सैन्याने नाही जगला तर संतांच्या बोधाने जगला आहे. जेव्हा जेव्हा देश संकटात आला तेव्हा तेव्हा संतांनी जन्म घेऊन देशाला शिकवणं दिली आणि जगवलं. देशावर संकट आलं की संत येतात. मुस्लिमांच्या आक्रमणाचे वेळी ज्ञानेश्वर, तुकाराम आले आणि लोकांना धर्म शिकवला. लोक आळशी झाले तेव्हा समर्थ रामदास आले आणि बलशाली बना सांगितलं. इंग्रजांच्या वेळी गांधी, विनोबा आणि राष्ट्रसंत तुकडोजी आले. उदा- घरात लहान मुलगा चुकतो तेव्हा वडील मारत नाहीत तर बोध देतात. तसेच संत या देशाचे वडील आहेत. त्यांनी कधी तलवार उचलली नाही तर बोध देऊन देशाला जगवलं. ज्ञानेश्वरांनी गीता, तुकारामांनी अभंग आणि तुकडोजी महाराजांनी ग्रामगीता सांगितली. याच बोधाने देश जगला. राष्ट्रसंत म्हणतात, पुन्हा तीच वेळ आली आहे, देव पुन्हा दुर्बल झाला आहे. पुन्हा लोकांमध्ये भांडणे लागली, आळस आला आहे. व्यसने वाढली आहेत. परदेशीं विचारांचे आक्रमण झालं आहे. हे सामान्य माणसा, हे गरीबा, हे रंका आता समजून घे आणि साथ दे. आता संताच कामासोबतच तुला पण साथ द्यावी लागेल.
बिघडले ब्रीद जनतेचे, चरित्रे नासली सारी |
मंत्र द्या राष्ट्रधर्माचा, शुरत्वे टाळण्या धोका ||2||
राष्ट्रसंत म्हणतात, जनतेचं ब्रीद – वचन, प्रतिष्ठा बिघडली आहे. सगळ्यांची चरित्र्य नासली आहेत, खराब झाली आहेत. पूर्वी लोकांच एक ब्रीद होत. “मी खोटं बोलणार नाही, मी देशासाठी जगेन, मी गरीबाला मदत करीन.” पण आता हे ब्रीद बिघडलं. आता लोक म्हणतात, खोटं बोलीन आणि पैसा कमवीन. त्यामुळे सगळ्यांची चरित्रे नासली, खराब झाली, लाच घेणं, व्यसन करणं, शिव्या देणं यामुळे सगळ्यांचे चरित्र नासले आहे. उदा- शिवाजी महाराजांच ब्रीद काय होत? “रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावायचा नाही” आज एखादा पुढारी निवडून येण्यापूर्वी म्हणतो, मी गाव सुधारेन. पण निवडून आल्यावर तो तेच ब्रीद बिघडवतो. राष्ट्रसंत म्हणतात राष्ट्रधर्माचा मंत्र द्या जेणेकरून शुरपणाने हा धोका टाळता येईल. यावर उपाय काय? लोक पोलीस लावून, कायदा करुन ही उद्धारणार नाही. यासाठी मंत्र द्यावा लागेल. मंत्र म्हणजे कानात सांगितलेल गुप्तज्ञान, जे मनात रुजतं. राष्ट्रधर्म म्हणजे काय? राष्ट्र हाच माझा धर्म आहे. माझा धर्म हिंदू मुस्लिम नाही. माझा धर्म देशाची सेवा हा मंत्र संतांनी दिला आहे. शूर बनून, हिंमतीने हा धोका टाळण्यासाठी देश दुर्बल होण्याचा जो धोका आहे. चरित्र नासण्याचा जो धोका आहे तो भित्र्या माणसाने नाही टळणार, त्यासाठी शूर व्हावं लागेल. देशासाठी चांगल वागावं लागेल. लाच घेता येणार नाही मी व्यसन करणार नाही तेव्हा कुठे तुमच्या वागण्याने देश बलवान होईल.
बहूदिवसांची ही रुजली, विषमता पंथ जातियता |
करा नवनिर्मिती जमुनी, वाजवा भारती डंका ||3||
राष्ट्रसंत म्हणतात, अनेक दिवसांपासून ही विषमता, जातिभेद आणि पंथभेद खोलवर रुजली आहे. मुळ धरुन बसली आहे. एकत्र येऊन नवीन निर्मिती करा आणि भारताचा डंका, विजयाचा नगारा वाजवा. जसं झाडाचं बी जमिनीत रुजतं आणि त्याची मुळ खोल जातात. तशीच वाईट गोष्ट, विषमता, जातीभेद, पंथभेद आपल्या मनात रुजली आहे. माझा धर्म वेगळा, तू खालच्या जातीचा, मी वरच्या जातीचा ही विषमता आपल्या समाजात इतकी खोल रुजली आहे की ती सहज निघत नाही. महाराज म्हणतात हीच खरीक देशाच्या दुर्बलपणाची कारणं आहेत. आता काय करायचं? भांडत बसायचं आणि रडत बसायचं, काही तर हिंदू -मुस्लिम, मराठा-दलित, ब्राह्मण-गरीब, श्रीमंत सगळ्यांनी एकत्र येऊन नवीन भारताची निर्मिती करायची आहे. जुनी विषमतेची इमारत पाडून, नवीन समतेची इमारत बांधायची. जातीभेद दूर सारुन सगळे एकत्र येऊन देशाचा डंका वाजवू या. एकत्र आलो तरच भारत महान होईल.
लोक हे वीर हो, तपस्वी कष्ट करणारे |
म्हणे तुकड्या अभय वर द्या, दीनांची हाक ही ऐका ||4||
शेवटी महाराज आशिर्वाद काय मागतात बघा. तेक मागत नाहीत. “लोक श्रीमंत होऊ दे” ते मागतात, लोक वीर होऊ दे आणि तपस्वी होऊ दे. वीर म्हणजे काय? तलवार चालवणारा वीर नाही तर अन्यायाविरुद्ध बोलायची हिंमत असणारा वीर. तपस्वी म्हणजे जंगलात जाऊन डोळे बंद करुन बसणारा नाही तर कष्ट करणारा तपस्वी, घाम गाळून काम करणारा, शेतात राबणारा, कारखान्यात काम करणारा, अभ्यास करणारा हाच खरा तपस्वी, आपलं काम बरं असे म्हणणारे लोक आहेत. महाराज म्हणतात असं नको, सगळे वीर व्हा. वीर आणि तपस्वी दोन्ही एकत्र आले पाहिजे. राष्ट्रसंत म्हणतात या लोकांना अभय द्या. लोक आज घाबरले आहेत आणि दीनांची हाक ऐका. दीन म्हणजे गरीब, दुबळा, ज्याला कोणी नाही त्यांची हाक, आरोळी ऐका. श्रीमंताची हाक सगळेच ऐकतात पण गरीबाची हाक ऐका. तुकडोजी महाराजांनी दीनांची हाक ऐकली आणि त्यांची सेवा केली.

पुरुषोत्तम बैसकार, मोझरकर
व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार प्राप्त
श्री गुरुदेव प्रचारक यवतमाळ
फोन 9921791677