भारतीय जैन संघटनेच्यावतीने जागतिक कॅन्सर दिनानिमित्त जनजागृती
अकलूज वैभव न्यूज नेटवर्क
आकाश भाग्यवंत नायकुडे, अकलूज.
दिनांक 07/02/2026 : भारतीय जैन संघटना ग्रामीण विभाग सदाशिवनगर च्यावतीने जागतिक कॅन्सर दिन निमित्त ४ फेब्रुवारी रोजी जनजागृती करण्यात आली.
यासाठी डॉक्टर तेजस निरंजन चंकेश्वरा ( चंकेश्वरा हॉस्पिटल नातेपुते ) यांनी कॅन्सर विषयी माहिती देताना कॅन्सर होण्याची कारणे व त्यावरील उपाय सांगितले. पहिल्या स्टेपला कॅन्सर असेल तर तो बरा होऊ शकतो. सध्या फास्ट फूड, फळभाज्या, पालेभाज्यां लवकर येण्यासाठी वापरण्यात येणारी केमिकल्स, दारू, सिगारेट, तंबाखू यामुळे कॅन्सर होऊ शकतो. वेळीच कॅन्सरच्या तपासण्या केल्या तर रुग्ण कॅन्सरच्या विळख्यातून वाचू शकतो. देशामध्ये लाखो रुग्ण कॅन्सर मुळे मृत्युमुखी पडतात. स्त्रियांच्या बाबतीत होणारे कॅन्सर हे जर वेळीच ओळखून त्याच्यावर उपचार केले तर ते बरे होऊ शकतात. कॅन्सरच्या टेस्ट वेळोवेळी करून घेतल्या तर पुढे होणारे लाखो रुपयांचे नुकसान होणार नाही असे मार्गदर्शन डॉक्टरांनी केले. तसेच भारतीय जैन संघटना ग्रामीण विभाग चे उपाध्यक्ष प्रमोद अनंतलाल दोशी यांनी टीबी, कॅन्सर यासारख्या रोगाची आपण शिबीर, व्याख्याने ठेवून जनजागृती केली तर याचा सर्व लोकांना नक्कीच फायदा होणार आहे. भारतीय जैन संघटना ही नेहमीच समाजासाठी कार्यरत असते व ते असे वेगवेगळे कार्यक्रम घेऊन ते लोकांपर्यंत पोहोचवत असते आणि याचा अनेक लोकांना फायदा झालेला दिसून येतो असे सांगितले. तसेच भारतीय जैन संघटना यांचेकडून जलयुक्त शिवार अभियान, स्मार्ट गर्ल प्रोग्राम, मूल्यवर्धन शिक्षण, महिला व युवा सक्षमीकरण या कार्यक्रमातून सुद्धा अनेक गावांना याचा फायदा झालेला आहे. या कार्यक्रमासाठी भारतीय जैन संघटना सदाशिवनगर चे अध्यक्ष अभिजीत दोशी तसेच सचिव अजय गांधी, डॉक्टर निवास गांधी व नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.